Thursday 24 April 2014

**** अनुभवाचे शास्त्र ****

   'शास्त्र' हा परवलीचा शब्द आहे. आपल्या ऋषीमुनींनी कसे वागावे? हे ज्यातून सांगितलेले आहे तेच धर्मशास्त्र. शास्त्र म्हणजे एखाद्या गोष्टीचे Science ! शास्त्राची चपखल व्याख्या सांगताना प. पू. श्री शिरीषदादा कवडे म्हणतात, " 'पूर्वी असे होऊन गेले, आता असे आहे व पुढेही असेच राहील'; हे अनुभव व विश्वासपूर्वक प्रतिपादन ज्यामधून होते तेच शास्त्र होय. शास्त्र हे काळानुसार बदलत नसते अथवा त्यात भरही पडत नसते."

       आपले पूर्वीचे ऋषी-मुनी, धर्मस्थापक थोर महापुरुष हे सगळे  अद्भुत ज्ञानी होते. आजच्या भाषेत सांगायचे तर ते थोर scientist होते. त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असल्याने त्यांच्या सांगण्याला विशेष महत्त्व असते. अशा महात्म्यांनी साधकांना किंवा परमार्थाच्या वाटेवर चालणाऱ्यांना येणाऱ्या अनुभवांचे शास्त्रच सविस्तर वर्णन करून ठेवलेले आहे.

     परमार्थ करीत असताना प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव हे येतातच. पण हे अनुभव खरेच भगवंतांच्या कृपेने आले का आपल्या मनानेच आपण त्यांची कल्पना केली? हे आपले आपल्याला सांगणे शक्य नसते. त्यासाठी थोर महात्म्यांना, आपल्या श्रीगुरूंनाच त्याबाबत विचारावे लागते. ते बरोबर ओळखतात की, हे कोणत्या प्रकारचे अनुभव आहेत व यांना साधनामार्गात कितपत महत्त्व द्यायचे. 

     अनुभवांचे स्वतंत्र शास्त्र असते. त्या विशिष्ट शास्त्रीय चौकटीत जर ती गोष्ट बसली तरच तिला खरा अनुभव म्हणतात. अन्यथा तो मनाचा किंवा भावनेचा खेळच असतो. अशा प्रकारच्या अनुभवांना  परमार्थामध्ये विघ्न मानलेले आहे. 

      सध्या जो उठतो त्याला श्रीस्वामीमहाराजांचा किंवा नवनाथांचा किंवा श्रीदत्तप्रभूंचा आदेश होताना दिसून येतो. यात तथ्य किती व भावनांचा खेळ किती? हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही. पण आपण इतके तरी नक्कीच समजू शकतो की, श्रीस्वामीमहाराज, श्रीदत्तप्रभू हे काही एवढे सहज सोपे नाहीत की कोणालाही त्यांचे आदेश व्हावेत. श्रीस्वामीमहाराज हे साक्षात् परब्रह्म आहेत मग ते प्रत्यक्ष एखाद्याशी बोलायला त्याची केवढी पात्रता हवी? त्या पात्रतेची निदर्शक अशी कोणती लक्षणे दिसतात सदर व्यक्तीमध्ये? या सर्वांचा काहीच अभ्यास किंवा विचार न केल्यामुळे आपल्याला वाटते की एखाद्याला फार विलक्षण अनुभव येत आहेत. मग तो आपल्यासाठी  साक्षात् अवतारी महात्माच ठरतो. ही खरेतर आपलीच आपण स्वत: करून घेतलेली शुध्द फसवणूक आहे. अशा प्रकारची भलावण करणारे तथाकथित अवतारी लोक व त्यांच्यावर विश्वास ठेवणारे साधक, दोघेही नरकात जातात असेच संतांनी स्पष्ट सांगून ठेवलेले आहे.

     आजमितीस कर्दळीवनासंबंधी प्रकाशित झालेली जी काही पुस्तके माझ्या वाचनात आली, त्यांमध्ये शास्त्रांनी भावनेचे खेळ म्हणून सांगितलेल्या गोष्टीच, ' फार विलक्षण अनुभव ' म्हणून छापलेल्या पाहायला मिळाल्या. अशी स्वत:ची व पर्यायाने वाचकांची दिशाभूल करून काय पदरात पडणार? शेवटी भोळ्या भाविकांच्या श्रद्धेशी खेळल्याचे महापापच लागणार ना !

विविध माध्यमांमधून, प्रवचनांमधून किंवा अनुभवकथनाच्या नावाखाली अशा विपरित गोष्टींचा सतत भडिमार झाल्यामुळे, अननुभवी भक्त भ्रमतात आणि संमोहित झाल्यासारखे या पुस्तकांतील चुकीच्या माहितीलाच खरे समजू लागतात. त्याच गोष्टींचे गोडवे गाऊ लागतात. हीच माणसांची सामान्य मानसिकता बरोबर हेरून सध्या कर्दळीवन यात्रांचे जोरदार मार्केटिंग केले जात आहे. 

अनुभवाचे शास्त्रच माहीत नसल्यामुळे अशी फसगत होते. हे सध्याच्या काळाचे मोठे दुर्दैवच म्हणायला हवे !

4 comments:

  1. thank you Rohanji...for sharing such a good n factual information. keep it up.

    ReplyDelete
  2. आदेश होतात तरी कसे?
    आदेश होणे म्हणजे काय?
    मला हे दोन प्रश्न भेडसावतात कृपया ह्याची उकल होईल का?

    ReplyDelete
  3. आदेश ज्यांना होतात, ते लोक कधीच त्यांची प्रसिद्धी करत फिरत नाहीत. जे प्रसिद्धीच्या मागे असतात, त्यांना होणारे आदेशही खोटे व काल्पनिकच असतात, हे पक्के लक्षात ठेवा. आदेश होणे म्हणजे देवतांनी दिव्य रूपात किंवा मनाच्या स्तरावर काही संदेश देणे होय. पण सध्याच्या काळात आदेश व्हावेत असे उत्तम अधिकारी लोक खूपच कमी, म्हणजे हाताच्या बोटावर मोजावे एवढेही नाहीत.

    ReplyDelete
  4. आदेश ज्यांना होतात, ते लोक कधीच त्यांची प्रसिद्धी करत फिरत नाहीत. जे प्रसिद्धीच्या मागे असतात, त्यांना होणारे आदेशही खोटे व काल्पनिकच असतात, हे पक्के लक्षात ठेवा. आदेश होणे म्हणजे देवतांनी दिव्य रूपात किंवा मनाच्या स्तरावर काही संदेश देणे होय. पण सध्याच्या काळात आदेश व्हावेत असे उत्तम अधिकारी लोक खूपच कमी, म्हणजे हाताच्या बोटावर मोजावे एवढेही नाहीत.

    ReplyDelete