Thursday 24 April 2014

**** अनुभवाचे शास्त्र ****

   'शास्त्र' हा परवलीचा शब्द आहे. आपल्या ऋषीमुनींनी कसे वागावे? हे ज्यातून सांगितलेले आहे तेच धर्मशास्त्र. शास्त्र म्हणजे एखाद्या गोष्टीचे Science ! शास्त्राची चपखल व्याख्या सांगताना प. पू. श्री शिरीषदादा कवडे म्हणतात, " 'पूर्वी असे होऊन गेले, आता असे आहे व पुढेही असेच राहील'; हे अनुभव व विश्वासपूर्वक प्रतिपादन ज्यामधून होते तेच शास्त्र होय. शास्त्र हे काळानुसार बदलत नसते अथवा त्यात भरही पडत नसते."

       आपले पूर्वीचे ऋषी-मुनी, धर्मस्थापक थोर महापुरुष हे सगळे  अद्भुत ज्ञानी होते. आजच्या भाषेत सांगायचे तर ते थोर scientist होते. त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असल्याने त्यांच्या सांगण्याला विशेष महत्त्व असते. अशा महात्म्यांनी साधकांना किंवा परमार्थाच्या वाटेवर चालणाऱ्यांना येणाऱ्या अनुभवांचे शास्त्रच सविस्तर वर्णन करून ठेवलेले आहे.

     परमार्थ करीत असताना प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव हे येतातच. पण हे अनुभव खरेच भगवंतांच्या कृपेने आले का आपल्या मनानेच आपण त्यांची कल्पना केली? हे आपले आपल्याला सांगणे शक्य नसते. त्यासाठी थोर महात्म्यांना, आपल्या श्रीगुरूंनाच त्याबाबत विचारावे लागते. ते बरोबर ओळखतात की, हे कोणत्या प्रकारचे अनुभव आहेत व यांना साधनामार्गात कितपत महत्त्व द्यायचे. 

     अनुभवांचे स्वतंत्र शास्त्र असते. त्या विशिष्ट शास्त्रीय चौकटीत जर ती गोष्ट बसली तरच तिला खरा अनुभव म्हणतात. अन्यथा तो मनाचा किंवा भावनेचा खेळच असतो. अशा प्रकारच्या अनुभवांना  परमार्थामध्ये विघ्न मानलेले आहे. 

      सध्या जो उठतो त्याला श्रीस्वामीमहाराजांचा किंवा नवनाथांचा किंवा श्रीदत्तप्रभूंचा आदेश होताना दिसून येतो. यात तथ्य किती व भावनांचा खेळ किती? हे सर्वसामान्य माणसाला कळत नाही. पण आपण इतके तरी नक्कीच समजू शकतो की, श्रीस्वामीमहाराज, श्रीदत्तप्रभू हे काही एवढे सहज सोपे नाहीत की कोणालाही त्यांचे आदेश व्हावेत. श्रीस्वामीमहाराज हे साक्षात् परब्रह्म आहेत मग ते प्रत्यक्ष एखाद्याशी बोलायला त्याची केवढी पात्रता हवी? त्या पात्रतेची निदर्शक अशी कोणती लक्षणे दिसतात सदर व्यक्तीमध्ये? या सर्वांचा काहीच अभ्यास किंवा विचार न केल्यामुळे आपल्याला वाटते की एखाद्याला फार विलक्षण अनुभव येत आहेत. मग तो आपल्यासाठी  साक्षात् अवतारी महात्माच ठरतो. ही खरेतर आपलीच आपण स्वत: करून घेतलेली शुध्द फसवणूक आहे. अशा प्रकारची भलावण करणारे तथाकथित अवतारी लोक व त्यांच्यावर विश्वास ठेवणारे साधक, दोघेही नरकात जातात असेच संतांनी स्पष्ट सांगून ठेवलेले आहे.

     आजमितीस कर्दळीवनासंबंधी प्रकाशित झालेली जी काही पुस्तके माझ्या वाचनात आली, त्यांमध्ये शास्त्रांनी भावनेचे खेळ म्हणून सांगितलेल्या गोष्टीच, ' फार विलक्षण अनुभव ' म्हणून छापलेल्या पाहायला मिळाल्या. अशी स्वत:ची व पर्यायाने वाचकांची दिशाभूल करून काय पदरात पडणार? शेवटी भोळ्या भाविकांच्या श्रद्धेशी खेळल्याचे महापापच लागणार ना !

विविध माध्यमांमधून, प्रवचनांमधून किंवा अनुभवकथनाच्या नावाखाली अशा विपरित गोष्टींचा सतत भडिमार झाल्यामुळे, अननुभवी भक्त भ्रमतात आणि संमोहित झाल्यासारखे या पुस्तकांतील चुकीच्या माहितीलाच खरे समजू लागतात. त्याच गोष्टींचे गोडवे गाऊ लागतात. हीच माणसांची सामान्य मानसिकता बरोबर हेरून सध्या कर्दळीवन यात्रांचे जोरदार मार्केटिंग केले जात आहे. 

अनुभवाचे शास्त्रच माहीत नसल्यामुळे अशी फसगत होते. हे सध्याच्या काळाचे मोठे दुर्दैवच म्हणायला हवे !

Thursday 17 April 2014

** अनुभूती : समज - गैरसमज **

नमस्कार मंडळी,

" कर्दळीवन " या विषयावर आजमितीस भरपूर वाङ्मय बाजारात उपलब्ध आहे. अनेकांनी आपापली पुस्तके काढली आहेत, खास कर्दळीवन यात्रा कंपन्या पण आहेत. लोकांना यात्रेत आलेले अनुभव अशा पुस्तकांमधून वाचायला मिळतात. कोणी कोणी या विषयावर संशोधन करून काही नवीन माहिती प्रकाशित केल्याचा दावाही करतात.

दुर्दैवाने या सर्व पुस्तकांमधील फारच थोडी माहिती शास्त्रशुद्ध असल्याचे वाचताना सतत जाणवते. किंबहुना, दत्त संप्रदायाच्या तत्त्वपरंपरेला धरून आणि सांप्रदायिक मोजपट्ट्यांवर तपासून पाहिलेल्या माहितीचा यात पूर्ण अभावच आहे. भावनिक स्तरावर, कल्पनेच्या विलासातून निर्माण झालेल्या योगायोगाच्या चमत्कारसदृश गोष्टींना, घटनांना " दिव्य पारमार्थिक अनुभूती " म्हणता येत नाही. त्या केवळ भावनाच असतात आपल्या. मग कोणाला स्वामींचे दर्शन होते तर कोणाला दिव्य चैतन्य लहरी जाणवतात. कोणाला शांतता अनुभवाला येते तर कोणाला तेजाचे दर्शन होते. कोणाला सहज समोर आलेल्या एखाद्या श्वानामध्ये दत्तप्रभू दिसू लागतात तर कोणाला अचानकच काही आदेश होऊ लागतात. असल्या अनुभूती श्रद्धेची वाढ करतात असे म्हटले जाते. पण वस्तुत: हे सगळे कल्पनाविलासच असतात. परमार्थाच्या दृष्टीने यांची किंमत शून्य असते.

अशाच शेकडो अनुभवांनी ही सगळी पुस्तके भरलेली आहेत. या घटना परमार्थ तर वाढवत नाहीतच, उलट ज्याला अनुभव येतो त्याचा अहंकार आणि नाही येत त्याचा मत्सर वाढवण्यास कारणीभूत होतात. हे दोन्हीही भक्तीमध्ये फार घातक ठरतात.

या सर्व पार्श्वभूमीवर, कर्दळीवनाची वस्तुस्थिती श्रीदत्तसंप्रदायाच्या विशुद्ध  दृष्टीकोनातून प्रथमत: " श्रीवामनराज " या त्रैमासिकाच्या कार्तिक अंकात नुकतीच प्रकाशित झालेली आहे. संत वाङ्मयाचे ज्येष्ठ अभ्यासक व श्रीस्वामी समर्थ महाराज व प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांच्या परंपरेतील थोर विभूती, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांनी, श्रीवामनराज अंकातील " कृष्णातिरीच्या वसणाऱ्या" या आपल्या प्रवचनात, सर्वात प्रथम कर्दळीवनाविषयीची खरी माहिती लोकांना उपलब्ध करून दिलेली आहे. सदर माहिती नीट अभ्यासल्यास कर्दळीवनासंबंधीचे अनेक समज-गैरसमज पूर्णत: दूर होतील यात शंका नाही.

Tuesday 15 April 2014

***** कळकळीची विनंती *****

सर्व श्रीस्वामीभक्तांना सादर नमस्कार !

मी या लेखाद्वारे एका अतिशय महत्त्वाच्या व गंभीर बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे गुप्त होण्याचे व श्रीस्वामी समर्थ महाराजांचे प्रकट होण्याचे स्थान म्हणून आंध्रप्रदेशातील " कर्दळीवन " या स्थानाचा सध्या खूप गवगवा केला जात आहे. अनेक भोळ्या भाबड्या स्वामीभक्तांना खोटी-नाटी माहिती सांगून भावनिक ब्लॅकमेल करून, त्यांची दिशाभूल करून, या कर्दळीवनाच्या यात्रेच्या नावाखाली भक्तांची आर्थिक, मानसिक व भावनिक फसवणूक सध्या खूप मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आहे. अनेक पुस्तके छापून, त्यांच्या विविध भाषांतील आवृत्या काढून व भरमसाठ पैसे घेऊन कर्दळीवनाच्या यात्रा काढून त्यातून प्रचंड पैसे कमवण्याचा मोठा धंदा सध्या बोकाळलेला आहे. स्वामीभक्तांना यातील तथ्य सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच !

श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात नाही तर श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृष्य होऊन श्रीदत्तलोकात प्रकट झाले होते. याला श्रीगुरुचरित्रात पुरावे आहेत. तसेच श्रीस्वामी समर्थ महाराज हस्तिनापूर जवळील छेली या खेडेगांवी चैत्र शुद्ध द्वितीयेला इ.स. १०७१ मध्ये प्रकट झाले होते. श्रीस्वामीसुत महाराज त्यांचा जन्मोत्सव देखील साजरा करीत असत. या वर्णनानुसार श्री. नानाजी रेखींनी केलेल्या श्रीस्वामींच्या पत्रिकेला स्वत: श्रीस्वामी महाराजांनी मान्यता दिलेली होती.

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी व श्री स्वामी समर्थ महाराज हे जरी श्रीदत्तप्रभूंचेच अवतार असले तरी त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये पाहता, ते पूर्णपणे भिन्न अवतार ठरतात. तसेच श्रीस्वामी समर्थ महाराज १०७१ मध्ये प्रकटले व श्रीनृसिंह सरस्वती तेराव्या शतकात. म्हणजे श्रीस्वामी समर्थ हे श्रीनृसिंह सरस्वती स्वामींच्याही आधीपासून कार्यरत होते. त्यामुळे श्रीनृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाले व ३०० वर्षे तपश्चर्या करून लाकुडतोड्याच्या निमित्ताने श्रीस्वामीरूपात प्रकटले, या कथेला कोणताही सांप्रदायिक आधार नाही. अनेक अधिकारी स्वामीशिष्य ही कथा पूर्णपणे कपोलकल्पितच मानतात.
आज जे कर्दळीवन दाखविले जाते, तो मूळचा वामाचारी बौद्ध तांत्रिकांचा व शाक्त कापालिकांचा अड्डा होता. आजही त्यांचे धागे-दोरे तेथे आहेतच. अशा स्थानांवर संन्याशांनी जाऊ नये, अशी शास्त्राज्ञा असताना हे दोन्ही दत्तावतारी महात्मे तेथे तपश्चर्या करण्यासाठी राहिले होते, ही गोष्ट पटण्यासारखी नाही.

कलियुगाचा महिमाच असा आहे की, त्यात खोट्या गोष्टींना सत्य मानले जाऊन ऊत येतो. कर्दळीवन प्रकरण हा त्याचाच नमुना असून आपल्या व्यावसायिक फायद्यांसाठी लुच्च्या लोकांनी त्याला खोटी प्रसिद्धी दिलेली आहे. आता तर त्या सरकारी अभयारण्य म्हणून घोषित झालेल्या कर्दळीवनाचा विकास (?) करण्याच्या नावाखाली देश-विदेशातून भरमसाठ देणग्या मिळवून स्वत:ची तुंबडी भरण्याचाही भयंकर उद्योग काहींनी राजरोस सुरू केलेला आहे. श्रीस्वामी भक्तांनी असल्या कोणत्याही भूलथापांना, प्रलोभनांना बळी पडून कर्दळीवनाच्या निरर्थक यात्रा करून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये, हीच कळकळीची विनंती.


वरील माहिती श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपा परंपरेतील थोर सत्पुरुष, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या प्रवचनातून घेतलेली असून पूर्णत: सत्य व दत्तसंप्रदायाला धरून आहे. जिज्ञासू वाचकांनी अधिक माहितीसाठी कृपया खालील संदर्भ आवर्जून वाचावेत ही विनंती.

1. " कृष्णातिरीच्या वसणाऱ्या " - प्रवचन- प. पू. श्री. शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज त्रैमासिक कार्तिक अंक, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे-५१.
2. " कर्दळीवनाची वस्तुस्थिती " - लेख- रोहन उपळेकर, ग्रहसंकेत मासिक एप्रिल अंक, नवीन प्रकाशन, पुणे ३०. (ग्रहसंकेत मासिकात आलेला हा लेख "या इथे क्लिक केल्यावर वाचता येईल")

 सर्व स्वामी भक्तांना कळकळीची विनंती की, ही माहिती जास्तीतजास्त शेयर करून अधिकाधिक स्वामीभक्तांपर्यंत पोचवून, या सध्या चालू असलेल्या प्रचारकी फसवणुकीला हकनाक बळी पडण्यापासून वाचवावे ही प्रार्थना !

** प्रारंभिक **

नमस्कार मित्रहो, 
सध्या आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य जवळील कर्दळीवनाच्या यात्रांचे पेव फुटले आहे. जो उठतो तो कर्दळीवनाची यात्रा करून येतो आणि स्वत:ला परम भाग्यवान , धन्य समजू लागतो. अनेक लोकांनी खास कर्दळीवनासाठीच यात्रा कंपन्या काढलेल्या आहेत. कर्दळीवनाचे नसलेले महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी सेवा संघ, संस्था वगैरे स्थापून, त्यांच्या मार्फत दिशाभूल करणाऱ्या माहितीची पुस्तके छापली जात आहेत. त्या पुस्तकांचे पद्धतशीर मार्केटिंग करून, लोकांना इमोशनल ब्लॅकमेल केले जाते व ही यात्रा करण्याचे त्यांच्या गळी उतरवले जाते. हा सगळाच भयंकर प्रकार पाहून जीव कासाविस होतो. 
वस्तुत: ह्या कर्दळीवनाला खरोखरीच एवढे महत्त्व आहे का श्रीदत्तसंप्रदायात? उपलब्ध पुरावे व संतांच्या चरित्रातील संदर्भ पाहता, सध्याच्या कर्दळीवनाला कोणताच भक्कम आधार सापडत नाही. उलट या कर्दळीवनात जाण्याचा निषेधच सांगितलेला बघायला मिळतो दत्त संप्रदायाच्या वाङ्मयात. तसेच पूर्वीचे कोणाीही थोर दत्त सांप्रदायिक महात्मे या कर्दळीवनात गेल्याचा उल्लेखही सापडत नाही. 
या कर्दळीवनासंदर्भातील सगळी पूर्ण सत्य माहिती या नवीन ब्लॉगच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. जुन्या ग्रंथांतील व दत्त सांप्रदायिक महात्म्यांनी सांगितलेली या बद्दलची माहिती लोकांसमोर आणण्याच्या आमच्या या निरपेक्ष प्रयत्नाला , आपणां सर्वांचे सहकार्य निरंतर अपेक्षित आहे. हळूहळू या विषयाबद्दलच्या माहितीचे भरपूर संदर्भ ब्लॉगवरून देण्यात येतील. कृपया ही माहिती जरूर वाचावी व आपल्या परिचितांनाही ही माहिती देऊन असल्या फसवणुकीतून सर्वांची सोडवणूक करावी ही विनंती.

- रोहन उपळेकर